मराठी भाषा संवर्धन पंधरवडा


भवन्स महाविद्यालय (अंधेरी पश्चिम )

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०१८ – (कार्यक्रम वृत्तांत )

 

अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयात १ जानेवारी ते १५ जानेवारी २०१८ या काळात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठया उत्साहात साजरा केला. या काळात विविध स्पर्धांचे  आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आपले होते. या स्पर्धांमध्ये  केवळ महाविद्यालयीन विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकेतर कर्मचारीही उत्साहाने सहभागी झाले होते. शब्दकोडे  या स्पर्धेत विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मिळून ५० जण सहभागीi झाले होते. मराठी लेखक-कवींची नावे, मराठी चित्रपटांची नावे, मान्यवर मराठी व्यक्तींची नावे तसेच मराठी कलाकारांची नावे अशा विविध विषयांवर शब्दकोडी तयार करण्यात आली होती. या स्पर्धे सोबतच घोषवाक्य लेखनस्पर्धाही घेण्यात आली होती . पर्यावरण, वाहतूक नियम , भ्रष्टाचार निर्मूलन अशा दिलेल्या  विषयांवर  जवळपास २५ जणांनी घोषवाक्य तयार केली होती. कवी विंदा करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळें विंदांच्या कविता तसेच मंगेश पाडगावकर, शांत शेळके, इंदिरा संत आणि नारायण सुर्वे यांच्या कविता विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतिशय प्रभावीपणे सादर केल्या. स्पर्धेच्या शेवटी उत्स्फूर्तपणे मराठी तसेच हिंदीच्या प्राध्यापकांनीही नारायण सुर्वे व कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. कवितांची सुरेल मैफिल रंगत जावी असा माहोल तयार झाला होता.  विद्यार्थ्यांमध्ये अभिवाचनाची आणि अभिनयाची तसेच साहित्याची आवड निर्माण व्हावी या हेतूने नाट्यवाचन स्पर्धाही घेण्यात आली. एक आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आली होती ती म्हणजे मराठी स्वाक्षरी स्पर्धा. ही स्पर्धा  हा सगळ्यांच्याच  कुतूहलाचा विषय ठरली.  या स्पर्धेतही जवळपास २० जणांनी भाग घेतला होता. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या स्पर्धेचा  मनापासून आनंद घेतला.

या पंधरवड्याची सांगता डॉ. वीणा सानेकर  (के.जे. सोमैया महाविद्यालय, मराठी विभागप्रमुख ) यांच्या ‘सोंगटी ‘ या डॉ. विजया वाड लिखित कादंबरी कथनाने झाली. त्यांच्या या कार्यक्रमाने रसिक प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. डॉ. वीणा सानेकर यांच्याचेहस्ते विजयी स्पर्धकांना पारितोषिकेही देण्यात आली. विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून पुस्तक रूपात पारितोषिके देण्यात आली. डॉ. शैला माने  प्रा. नेहा  सावंत,  प्रा. ज्योती मालंडकर, प्रा. दीप्ती  सावंत, तसेच प्रा. सुप्रिया सबनीस या साऱ्यांच्या सहभागामुळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे हा पंधरवडा यशस्वीपणे संपन्न झाला.  या पंधरवड्यामुळे विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात मराठी भाषाभिमान जागृत करण्यात तसेच एकमेकांमध्ये  सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्यात हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निश्चित यशस्वी झाला असे म्हणता येईल.

                                                                                        वृत्तांतलेखन – प्रा. नेहा सावंत

 

Marathi Bhasha Pandhravada 1